लग्न गाठ

admin

Administrator
Staff member
तो आला... आणि आल्यापासून तीचं त्याच्याकडेच लक्ष होतं.. लक्ष वेधून घेण्यासारखंच त्याचं व्यक्तिमत्त्व होतं म्हणा. उंचपुरा, गोरापान आणि घाऱ्या डोळ्यांचा.

अगदी मॉडेल टाइपं. "किती राजबिंडा दिसतोय हा" ती त्यालाच न्याहाळत होती.. अगदी घायाळ झाली होती.

प्रेम नाही पण CRUSH नक्की म्हणता येईल. एक आकर्षण. उगीचच त्याची माहिती देखील मिळवली तिने रिसेप्शन काउंटरवरून. "निहार राठी. पंजाबी मुंडा.

सरांच्या बेस्ट फ्रेंडचा मुलगा आहे.. तू काही ट्राय नको करूस, उगाच वेळ फुकट जाईल. डाळ काय शिजणार नाही इथे." रिसेप्शन वरून माहिती आणि फुकटचा सल्ला देखील तिला मिळाला होता.

तिने देखील तेवढ्याच गुर्मीत उत्तर फेकल होत, "तू वरुण धवनचि स्वप्न बघतेस तेव्हा? तिथे तुझी डाळ शिजणार आहे असं वाटतंय का तुला..? बाय द वे थँक्स" पुढे संभाषण न वाढवता ती तिथून निघून गेली.

"ती".. या कथेची नायिका.. मनुश्री. वय वर्षे २२. स्वप्नांच्या राज्यात बागडणारी. अगदी एवढ्या मोठ्या शहरात राहूनही, रस्त्यावरून धावणाऱ्या महागड्या गाड्या पाहूनही आपल्याला न्यायला एखादा राजकुमार यावा, पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन अशी स्वप्न पाहणारी.. तसं पहायला गेलं तर सालस, संस्कारी.. कितीतरी भावनांनी ओतप्रोत भरलेली ती, आणि तीचं विश्व.

तशी चंचल स्वभावाचीच. स्वप्नात रमायची पण प्रत्यक्षाचं भान ठेऊन. म्हणजे एका क्षणाला राजकुमाराबरोबर निघून जाईन असं म्हणायची आणि दुसऱ्याच क्षणाला भानावर यायची.

अशा विचारांत असतानाच मग तिला मोठा भाऊ आणि बाबांचा धाक आठवायचा आणि पुन्हा स्वप्नांचा बंगला कोसळायचा. सत्य परिस्तिथिचि जाणीव तिला नेहमीच जागृत ठेवायची त्यामुळे "निहार"च काय इतर कोणा बाबतीतही तिची डाळ शिजणार नव्हती. काही दिवस निहार सोबत तिने स्वप्न पाहिली (अर्थात एकटीनेच) आणि मग एके दिवशी सगळं थांबलं..

तो आल्यावर बहरून जाणं त्याला चोरून पाहणं, उगाचच काम नसताना सरांच्या केबिनसमोर जाऊन तिथल्या कपाटात फाईल शोधतेय असं दाखवून त्याला न्याहाळणं.

मैत्रिणीने यामागचं कारण विचारल्यावर, "एवढा श्रीमंत आहे पण शिष्टाचार नाहीत.. starbucks ची कॉफी पिऊन उष्टा कप तसाच ठेऊन जायचा रिसेप्शनवर?

मुळात कॉफी संपवून येता येत नव्हतं का? नुसता Show off. असल्या माणसा सोबत कसा संसार करायचा? याची उष्टी काढावी लागतील फक्त.." हे असलं उत्तर ऐकून मैत्रीण समजून जायची "कोल्ह्याला द्राक्ष आंबट".

मनुश्रीचा राजकुमार धुक्यातच कुठेतरी हरवून जायचा. नेहमीप्रमाणेच.

तिची एका शब्दांत ओळख करून द्यायचं झाल तर स्वप्नाळू हे नाव शोभेल. धाडसाची सगळी कामं ती करायची पण स्वप्नातच आणि म्हणूनच कि काय, कधी कधी खूप चिडायची स्वतःवरच, "का हे असलं साध आयुष्य माझ्याच नशिबी? का मला नाही वागता येत मनासारख? का मी फक्त स्वप्नात रमायचं?

का मी प्रेम नाही करू शकत? का मीच सगळ्यांचा आदर राखायचा? सगळ्यांना घाबरायचं?" पण हे सगळे प्रश्न देखील तिच्या मनातच राहायचे.

पण त्या भोळीला कोण समजावणार होतं कि असं काही नसतं, प्रेम ठरवून आणि करायचं म्हणून नाही करता येत.. ते होतं आणि झाल्यावर ना एक वेगळा आधार निर्माण करतं ज्यामुळे बऱ्याच अशक्य गोष्टी शक्यही होऊन जातात. प्रेमात ताकद असते आणि ती प्रेम झाल्यावरच लक्षात येते.

अशा या स्वप्नाळूच्या प्रेमात पडला जगदीश; जगदीश कामत. या कथेचा नायक.. त्याला कुठे माहित होतं कि हि प्रेमाची लढाई त्याला एकट्यालाच लढावी लागणार होती म्हणून.

प्रेमाच्या रणांगणात तर तो उतरला होता, त्यामुळे आता फक्त जिंकणं बाकी होतं.. आणि त्यातही सर्वप्रथम त्याला जिंकायचं होतं मनुश्रीला. तिच्या होकाराला. तर त्यांच्या भेटीचा योग जुळून आला असा....

मनुश्रीला ऑफिसमध्ये पोहोचायला त्यादिवशी उशीरच झाला होता. धावत पळत ती ऑफिसच्या बिल्डींग खाली आली. गेट उघडले आणि. समोरच्या खुर्चीत वॉचमनला डुलक्या घेताना तिने पाहिले.

ती त्याच्यासमोर उभी राहिली, "ओ. हेल्लो. ओ सर" त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही हे पाहून ती आणखी जोरात ओरडली, "ओ. हेल्लो" वॉचमन त्या खणखणीत आवाजाने उठला आणि आता आपल्याला सणसणीत पडते कि काय या अविर्भावात तिच्याकडे बघत राहिला. "ड्युटी पे हो न सर? उठो अभी. सोने के लिये आये हो? नेक्स्ट टाइम सोते हुए दिखे तो कम्प्लेंट करूंगी आपकी" वॉचमन गप गुमान मान डोलावत होता.

ती तशीच पुढे निघाली आणि पुन्हा वळून म्हणाली, "ओ. सोने का नहीं." तिचे ते मोट्ठे डोळे आणि हातवारे पाहून वॉचमन त्या खुर्चीतूनच उठला आणि फेऱ्या मारू लागला.

हे तिने पाहिलं आणि ती खदखदून हसली. सगळा झालेला संवाद आणि प्रकार बाजूलाच बाइक पार्क करत असलेला जगदीश पाहत होता आणि तिच्याकडे पाहतंच राहिला.

काही क्षणात काहीतरी लक्षात येउन तोही ती गेली त्या दिशेने धावला. त्याचा अंदाज खरा ठरला होता. मनुश्री तिथेच लिफ्ट साठी थांबली होती. लिफ्ट आली आणि ते दोघे आत शिरले.

मनुश्री ने नववा मजला म्हणून लिफ्ट च बटन प्रेस केलं, आणि उभी राहिली. जगदीश तसाच उभा राहिलेला पाहून तिने विचारलं, "YOU? which floor?" त्याची तंद्री भंगली आणि त्याने लिफ्टच्या बटणांकडे पाहिलं;

आश्चर्य, आनंद आणि बऱ्याच काही मिश्र भावनांनी उत्तरला, "Same floor". तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं, पण अनोळखी व्यक्तीशी उगाच सलगी नको म्हणून ती फक्त पुसटशी हसली. नंतरचे क्षण स्तब्धता. "काहीच बोलली नाही" म्हणून हाही गप्पच उभा राहिला.

नवव्या मजल्यासमोर येउन लिफ्ट थांबली, त्याने स्त्री दाक्षिण्य वगैरे दाखवत तिला पहिले बाहेर जाऊ दिले. प्रत्येक मजल्यावर एकच ऑफिस आणि त्या नवव्या मजल्यावरील एकाच ऑफिसमध्ये दोघे शिरले.

ती तिच्या जागेवर जाऊन बसली आणि तिच्या मागोमाग आलेल्या जगदीश वर सगळ्यांची नजर गेली. "हाय जगदीश.. वेलकम बॅक", "काय सरप्राइजच दिलस.." आणि असेच किती तरी हर्षाने उल्हासित झालेले तिच्या डिपार्टमेंट मधले सगळेच सहकर्मचारी त्याच्याभोवती गोळा झाले. मनुश्रीने फक्त त्याचं नाव ऐकल आणि

"हाच का तो जगदीश कामत, बिझिनेस वाढवण्यासाठी बडोद्याला गेला होता.. गेली दोन वर्षे? अच्छा अच्छा" ती ह्याच विचारात असताना कोणीतरी तिची ओळख करून दिली. "हि मनुश्री नारकर, गेल्याच वर्षी आपल्या इथे जॉईन झाली. आणि हा जगदीश कामत." तिने लावलेला अंदाज बरोबर होता. यापुढे ते दोघे एकाच डिपार्टमेंट काम करणार होते.

दोघांच्याही मनात वेगवेगळ्या भावना प्रफुल्लीत झाल्या, त्याच्या मनात आत्ता हिची ओळख होणार म्हणून तर तिच्या मनात त्याच्या कामाबद्दलचा आदर म्हणून.

ज्या गेल्या वर्षभरात तिला त्या एका व्यक्तीला आदर्श ठेवून काम शिकवण्यात आलं होत, आत्ता त्याच व्यक्तीसोबत तिला काम करावं लागणार होतं.. आदर आणि दडपण.

जगदीश स्मार्ट आणि हुशार होता. कामाची त्याची शैली वेगळी होती आणि म्हणूनच नवीन शहरात व्यवसाय वाढवण्यासाठी त्याची नियुक्ती झाली होती आणि हि प्रगती त्याने मिळवली होती अवघ्या दीड वर्षात.

तिथलं सगळं सेट करूनच तो इथे परतला होता.. पहिली छाप.. फर्स्ट इम्प्रेशन.. मनुश्रीने जगदीशला पाहण्या अगोदरच त्याच्याबाबत बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या होत्या त्यामुळे आत्ताचं त्याचं भेटण निमित्त होत..

फक्त चेहऱ्याने ओळख होणं आणि जगदीश बाबत म्हणायचं तर त्याने मनुश्रीला वॉचमनशी वागतानाच पहिल्यांदा पाहिलं होत आणि तिचा तो मिश्किल स्वभाव त्याला आवडला होता, अन् ती मात्र त्याबाबतीत अनभिज्ञ होती.

काळचक्र पुढे सरकत होतं. दोन महिने झाले, कामाव्यतिरिक्त ती काही जास्त बोलत नव्हती आणि "हि.. हीच का ती?" ह्या विचारांपलीकडे तो काही जात नव्हता.

मुलींचे अंतरंग कधीच कोणाला कळले नाहीत याची त्याला प्रचीती येत होती. हि मुलगी इतकी मितभाषी असेल असं त्याला वाटलं नव्हतं. पण "वेळ", थोडा वेळ जाऊ दिला कि सगळं काही व्यवस्थित होतं त्याप्रमाणे तिची कळी त्याच्या मिश्किल, हसऱ्या स्वभावापुढे उमलत गेली.

कितीही मनाला आवरलं तरी जगदीशच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळी झलक होती, त्यामुळे कामापेक्षा थोडं जास्त बोलणं आता वाढलं होतं. थोडी थट्टा मस्करी बोलण्यात येऊ लागली, ऑफिस अवर्स सुरु होण्या आधीची १५-२० मिनिटे, लंच ब्रेक आणि पूर्ण दिवसातला थोडा इतरत्र वेळ गप्पांमध्ये जाऊ लागला आणि त्या बोलण्यातूनच तो तिला ओळखण्याचा प्रयत्न करत होता.

शांत असली तरी कधी वेळ आली तर सडेतोड उत्तरही ती द्यायची.. तिच्या घरचं "धाक" दाखवणारं वातावरण तिच्या मितभाषी स्वभावाचं कारण असावं या निष्कर्षापर्यंत तो पोहोचला होता..

पण नंतर कधीतरी एकटा असताना त्याने स्वतःलाच प्रश्न केला, "मी का गुन्ततोय इतका?" मग त्यालाच कुठेतरी जाणवलं होतं.. "मी प्रेमात पडलोय बहुतेक. मनुश्रीच्या.." परंतु त्याला सापडलेलं हे उत्तर तिला सांगणं म्हणजे निर्माण न झालेलं नातं संपवण्यासारखं होतं.

मनुश्री आपला प्रस्ताव स्वीकारेल हे शक्यच नाही.. आणि त्यामागचं कारण तिचे वडील आणि भाऊ. खरंतर कधी कधी त्याला वाटायचं कि हि उगाचच उहापोह करतेय, पण तिला ऑफिसमधून निघायला जरा जरी उशीर होणार असेल तर तिचा भाऊ तिला न्यायला येतो हे कळल्यावर त्याला तिच्या बोलण्यातला अर्थ कि धाक कळायला लागला होता.

महिने उलटत होते, कामाचा व्याप वाढला होता आणि दोघांना एकमेकांचा सहवास जास्त मिळत होता. विचारांची देवाण घेवाण, मनातलं हितगुज सांगणं वाढलं होतं. वैयक्तिकरित्याही दोघे एकमेकांना चांगलेच ओळखू लागले होते. दीड वर्ष होत आलं होत आणि मनुश्रीच्या बोलण्यातून तिलाही तो आवडतो याची खात्री त्याला झाली होती.

पण प्रेमविवाह असा काहीसा विषय निघालाच कि ती माघार घ्यायची. "जे शक्यच नाही त्या वाटेला जायचंच कशाला?" ह्या प्रश्नावर तो गप्प व्हायचा.

अप्रत्यक्षपणे तरी एखाद्याच्या मनाचा अंदाज किती वेळ बांधणार? शेवटी त्याने तिला विचारायचं ठरवलं.. कारण दुसरा पर्याय नव्हता, तिच्या घरी स्थळ बघण सुरु झालं होतं.

मनुश्रीचं तर स्वतःशीच द्वंद्व चाललं होतं, जगदीशच्या मनातलं तिने ओळखलं होतं तिलाही तो तिच्यासाठी योग्य वाटत होता पण ते स्वीकारायची तिला भीती वाटत होती..

घरी प्रेम हि गोष्ट स्वीकारणारच नाही हे तिने ठरवून टाकलं होतं, पण जगदीश हार मानणाऱ्यातील नव्हता, त्याने तिला एकदा स्पष्ट विचारलं, प्रेम आहे-नाही, चांद तारे नाही, सरळ साधा प्रश्न, "माझ्याशी लग्न करशील?" आणि तिनेही एका क्षणात दिलेलं उत्तर, "नाही." संपलं..

विषय संपला.. भावना हरवल्या. साधं सोप्प सरळ. "बाबांनी सांगितलेल्याच घरी माझ लग्न होईल.. माझी लग्नगाठ तेच जुळवणार, मी त्यांचा विरोध नाही स्वीकारू शकत, मला तू आवडतोस पण..." पुढचं ऐकायला जगदीश समोर थांबलाच नाही.

कदाचित त्याला हे उत्तर अपेक्षित होतं, पण नकळत तिने त्याला होकारही दिला होता. दोन दिवस दोघ गप्पच होते.

तिसऱ्या दिवशी जगदीश तिला म्हणाला, "तुझा नकार मला अपेक्षित होता, जबरदस्ती नाहीच माझी.. काहीच हरकत नाही, एखादं स्थळ नाकारलस असंच समज, आपली मैत्री माझ्याकडून कायम राहील.

तुझं मात्र माहित नाही. एका आठवड्यासाठी गावी जातोय, नकार पचवायला हवा ना? सुट्टीवर आहे.. काही गरज लागली कामात तर कळव, बाकी इतर गोष्टींसाठी तुझे बाबा आणि भाऊ आहेतच" उपहासात्मक असलं तरी त्याचं बोलणं खरंच होतं. तिने फक्त मानेने "हो" सांगितलं. तो निघून गेला.

एक आठवडा.. ती एकटीच होती, जगदीशचं आयुष्यात नसणं त्यामुळे अपूर्ण असं वाटणारं आयुष्य, तिला राग येत होता स्वतःच्या असह्हाय्यतेचा आणि जगदीश चाही.. "त्याने साथ द्यायला हवी होती ना? नकार मान्य केला लगेच.? असं असत का कुठे?" मग स्वतःच म्हणायची, "पण माझीच, मी सख्खी असून तयारी नव्हती माझ्याच घरच्यांच मन वळवण्याची तर तो तर लांबच राहिला.. नाही मला थोडा वेळ मागायला हवा होता त्याच्याकडे.. पण नाही नको.. राहू देत.. माझ्यात नाही तितकी हिम्मत.." ते पूर्ण सात दिवस तिने अश्रूंना वाहवण्यात घालवले. अगदी हताश होऊन.

आणि इथे जगदीश परतला तो.. पेढ्यांचा बॉक्स घेऊन.. "लग्न ठरलं जगदीश साहेबांचं.." हे सुधीर काकाचं बोलणं कानावर पडलं आणि तिला घेरीच आली.

"हा एका आठवड्यात मला विसरला?" प्रेम आणि इगो- मी पणा दुखावला तिचा, मात्र या दोन्ही भावनांमध्ये प्रेमाची जीत झाली, तिला राहवेना आणि तिने त्याला विचारलच, काहीसं हतबल होत "तू सात दिवसांपूर्वी मला लग्नासाठी विचारलंस आणि आता लग्नही करतो आहेस? दुसऱ्या कोणाशी?"

तिला पुढे बोलवेना, त्याने हसत उत्तर दिलं, "मला अभिनंदन तर कर आधी.." तिच्या रागाचा कटाक्ष दुर्लक्षित करत तो पुढे उत्तरला, एक प्रश्नोत्तरांची मालिकाच त्यांच्यात सुरु झाली.

तो - सगळ्यात आधी सात नाही; नऊ दिवसांपूर्वी मी तुला विचारलं होत, तू नकार दिल्यानंतर मी तुझ्यासाठी झुरत रहावं अशी अपेक्षा होती का?

ती - नाही पण. तू एवढ्या लगेच दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय कसा घेऊ शकलास?

तो - पुन्हा तेच. तूच नकार दिलास मला, थोडा वेळही नाही मागितलास.. ठाम होतीस न तू तुझ्या निर्णयावर ?.. मला थांबवलं पण नाहीस.. माझ्या घरच्यांनी चांगली मुलगी बघितली माझ्यासाठी, तेव्हा त्यांनी विचारल्यावर त्यांना काय उत्तर द्यायला हवं मी?

ती - पण?

तो - पण पण काय? तुझ माझ्यावर प्रेम होतं म्हणजे आहे ते डोळ्यांत दिसतंय तुझ्या, ते पाहूनच तुला विचारलं होतं मी लग्नासाठी. पण तू नाही म्हणालीस. प्रेम आहे ना? मग या प्रेमाला मिळवण्यासाठी.. आयुष्यभर सोबत ठेवण्यासाठी थोडा तरी प्रयत्न नको का तू करायला?

ती - मी चुकले.. पण घरी नाही मान्य करणार रे.. म्हणून.

तो - म्हणूनच मी दुसरीकडे लग्न ठरवलं.. काय हरकत आहे?

ती - मग दीड दोन वर्षांची आपली ओळख?

तो - तेच तर.. फक्त ओळखच तर होती.. जास्त काहीच नाही आणि ओळख तर आता जिच्याशी लग्न करणार आहे तिचीही होईलच कि हळू हळू.. आणि तुझी लग्न-गाठ , जे तुझे बाबा बांधणार आहेत त्याच्याशीही तुझी होईलच कि ओळख.. नव्याने.. नवीन ओळख.. ओळख तर क्षणांत होते ग.. आणि एका नकारात ती विसरावीही लागते. हो कि नाही?

ती - (आवंढा गिळत) अभिनंदन.. तू दुसऱ्या कुणाबरोबर.. सुखी..

तो - एक मिनिट.. तुला नक्की त्रास कशाचा होतोय? मी तुझ्यापासून दूर जातोय त्याचा कि मी दुसऱ्या कुणाचा तरी होतोय या गोष्टीचा?

ती - दोन्ही.

हे उत्तर तिने दिलं आणि रडायला लागली. (ऑफिस मध्ये नसती तर धाय मोकलून जोरजोरात रडली असती ती) तीच ते प्रामाणिक उत्तर ऐकून त्याला हसावं कि रडावं हे क्षणभर कळेचना. "म्हणजे त्रास होतोय तर " स्वतःला सावरलं त्याने....

तो - तू ओळखतेस तिला.

ती - (तिने चमकून पाहिलं, नाकातल पाणी वर ओढत, मान वर घेत तिने विचारलं. ) कोणाला?

तो - माझ्या होणाऱ्या बायकोला.

ती - कोण?

तो - तू. मनुश्री नारकर.

ती- तुला वेड लागलंय नाहीतर तू मला वेडी करतो आहेस.

तो- नाही. तूच मला वेडं केलं आहेस आणि ह्या वेड्याने आज अर्ध्या दिवसाची रजा टाकली आहे, आपल्या दोघांची आणि ती या वेड्याच्या बॉसने अप्रूव्ह देखील केली आहे.. म्हणजे आता आपण ऑफिसच्या बाहेर जायचं आहे जेणेकरून मोकळेपणाने बोलता येईल आणि तू वेडी होण्यापासून वाचशील.

ती - माझी 'लिव्ह' तू कशी अप्रूव्ह करून घेतलीस?

तो - कारण मी वेडा आहे.. काय गं आता काही मिनिटांपूर्वी तू रडत होतीस न आणि आता भांडते आहेस? कशा ग तुला सगळ्याच भावना लपवता येतात? मी बॉसची परवानगी घेतली आहे.. बाहेर जाऊयात मग सांगतो सगळं. इतका तरी विश्वास ठेव होणाऱ्या नवऱ्यावर.

त्याच्या डोळ्यातला विश्वास पाहून ती त्याच्यासोबत ऑफिसच्या बाहेर पडली. जवळच्याच रेस्टॉरंटमध्ये दोघ गेले. उगाच चकाट्या पिटत बसता येणार नाही म्हणून ऑर्डर केली. आता फक्त तो बोलणार होता आणि ती ऐकणार होती.

तो- मागचा पूर्ण आठवडा मी माझं प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतो. तुझ्या घरी जाऊन भेटून आलोय तेव्हाच इतक्या ठामपणे तुला सांगतोय.

तुझ्या घरून प्रेमविवाहाला मान्यता नाही मिळणार म्हणून एका संस्थेत विवाह इच्छुक म्हणून नाव नोंदवल. अर्थात तू गेल्याच महिन्यात तिथे नाव नोंदवल आहेस हे लक्षात ठेऊनच.

मग त्यांना थोडी सत्य परिस्तिथी सांगितली आणि तुझ्या बाबांना "एक अनुरूप स्थळ आलंय" म्हणून फोन करायला लावला. माझ्या घरी मी तुझ्याबद्दल अगोदरच कल्पना दिली होती, आणि त्यांचा काहीच आक्षेप नसल्याने ते तुझ्या घरच्यांना भेटायला हसत तयार झाले.

तुझे बाबा तसंही स्वतः आधी मुलगा पसंत करणार होते आणि नंतरच तुला विचारणार होते. म्हणून तुला काहीच कल्पना दिली नाही. तीन दिवसांपूर्वी तुझ्या बाबांना भेटलो त्यांनी दोन दिवस मागितले, आणि काल मला पुन्हा भेटायला बोलावलं.. होकार कळवण्यासाठी.

जगदीश बोलताना प्रत्येक वाक्यागणिक मनुश्रीच्या चेहऱ्यावरचे, डोळ्यांतले भाव बदलत होते.. "काय ग्रेट आहेस तू खरंच" हे तीचं बोलणं तो तिच्या चेहऱ्यावर वाचत होता, त्याला वाटत होतं, आपल्या डोळ्यांना व्हिडीओ शुटींग घेता आली असती तर हिचे सगळे भाव जपून ठेवले असते अगदी.. तो शेवटचं वाक्य बोलला आणि ते वाक्य ऐकून ती थोडी चिडलीच..

ती - बघ, सांगितलं होत न.. त्यांना (बाबांना ) माझ्या इच्छेशी काही देणं घेणं नाही, लगेच होकार कळवला सुद्धा? मला विचारायला हवं होत ना एकदा तरी?

तो - इथेच चुकलीस तू (तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह) मलाही आधी तसंच वाटलं होतं आणि त्यांचा थोडा रागही आला होता, पण त्यांना उल्लू.. सॉरी.. बनवल्याचं नकळत समाधान मी मानत होतो, जणू ते तुझ्याशी असं वागतात त्याचा बदला घेतल्यासारख वाटल.

पण आपण दोघेही चुकीचे होतो मनुश्री. ते मला भेटायला आले तेव्हा पहिले हेच वाक्य म्हणाले, "मनु ची निवड आवडली मला. तुला नकार दिला असेल तिने म्हणून तू एवढा आटापिटा करत घरी पोहोचलास आमच्या. दोन दिवस मागितले ते तुझी चौकशी करण्यासाठी.."

ती- त्यांना कसं कळालं?

तो- मी हि असाच रिएक्ट झालो.. ते शांतपणे उत्तरले, "बाप आहे मी तिचा. ती माझ्या शब्दाबाहेर कधीच जाणार नाही हा विश्वास आहे माझा तिच्यावर, पण तो विश्वास धाकातून कमावला आहे रे मी..

माझ्यासाठी आदर कधी दिसलाच नाही रे मला तिच्या डोळ्यांत. नेहमी भीतीच दिसायची.. पण तूच सांग. चूक झाल्यावर निस्तरत बसायची कि ती होण्याआधी खबरदारी घ्यायची?

जन्मदाता आहे मी. तिला जपण्यासाठीच निष्ठुर झालो मी, तिला धाक दाखवताना तिचं फक्त चांगल व्हाव हीच इच्छा असायची. माझा दुसरा काय स्वार्थ असणार? तू खरच चांगला मुलगा आहेस..

माझ्या मुलीला आयुष्यभर सांभाळ, मी तिला माझी जबाबदारी समजून मनात असूनही प्रेम नाही केलं, तू मात्र तिला खूप प्रेम दे.. जप तिला.. योग्य आहेस तू तिच्यासाठी.. तिची प्रत्येक आवड निवड जप रे." खूप भावूक झाले होते ग ते.. पाणवलेल्या डोळ्यांनी हे सगळं बोलताना. मलाच थोड शरमल्यासारख झालं.

पण लग्नाला होकार त्यांनी जरी दिला तरी मला ते पुन्हा म्हणाले, "एकदा मनुला विचार.. घरी ये, मुलीला नीट मागणी घाल.. मग तीही खूप आनंदी होईल.. कदाचित तेव्हा तरी मला तिच्या डोळ्यात माझ्याबाबत अभिमान दिसेल. आणि तुमची लग्न गाठ केव्हा बांधायची त्याची तारीख ठरवता येईल"

मनुश्री. आता तूच सांग.. हा मुलगा तुला पसंत आहे.. तसं पुढचं बोलणं ठरवता येईल.? त्याचं सगळं बोलणं ऐकून मनुश्रीच्या डोळ्यांतली आसवे थांबतच नव्हती, आज बापाची नव्याने ओळख झाली होती तिला, आणि ती ओळख मनात साठवून ती पुढचं आयुष्य तिच्या साथीदाराबरोबर घालवणार होती.

किती तरी नाती अबोल असतात ती समजून येतच नाहीत आणि जेव्हा समजतात तेव्हा अधिक परिपक्व आणि घट्ट झालेली असतात. मनुश्री आणि जगदीशची लग्न गाठ बांधली गेली.. नक्की कोणाच्या प्रयत्नांमुळे? अहो, लग्नाच्या गाठी तर परमेश्वरच बांधतो.. बाकी सगळे निमित्त मात्र....
Toggle signature 170*
Alpha Male
cool2.gif
 
Back
Top